Ad

Monday 2 January 2023

ज्या अर्थी...

ज्याअर्थी....


शासन निर्णय ( जी .आर.) इतके किचकट आणि दुर्बोध असतात की ते वाचून पूर्ण झाले की एकच गोष्ट आपल्याला कळते की आपल्याला काही घंटा कळलेले नाही...
    कायदेविषयक लेखा वाचून बघा..
    ज्या अर्थी... अमुक तमुक इथपासून जी सुरवात होते ते पान /दोन पान ज्याअर्थीच पसरलेले असते..मग कुठे तरी शेवटी " त्या अर्थी" लपून बसलेले असते...ज्याअर्थीची अनेक मायाजाले पार केल्यावर त्या कागदाचा प्राण असलेला " त्याअर्थी" चा पोपट शेवटच्या परिच्छेदाच्या पिंजऱ्यात बंद असतो.. पण तिथे पोहचेपर्यंत मतीने माती खाल्लेली असते..
     माणसाने खाण्यापासून शौचापर्यन्त सगळं काही "सुलभ" केलंय पण कायदा सुलभ करणे त्याला जमलेले नाही.क्लिष्टता हा कायद्याचा प्राण आहे. कायद्याचा एक आणि एकच अर्थ लागावा म्हणून क्लिष्टता अपरिहार्य असली पाहिजे..तो क्लिष्ट आहे म्हणून तर अनेकांचे उदरनिर्वाह चालतात ना..
     लोक पण किती नाटकी असतात ना कायदा समजत नाही म्हणून त्याला गाढव करून मोकळे झाले ,खरं तर आपल्याला कायदा समजत नाही म्हणजे आपणच गाढव असतो पण नावडतीचे मीठ अळणी तसा कायदा पण गाढवच..
     माणसातला सुसंवाद संपला की वादी आणि प्रतिवादी तयार होतात.. लांबत जाणारा दिवाणी खटला पाहून फिर्यादी " ऐसी " दिवाणगी" देखी नही कभी" अस म्हणत असेल का? मुळात खटला हा शब्द कसा निर्माण झाला असेल?? माणसाचा जन्म खाटल्यावर होतो आणि शेवटही खाटल्या वर होतो..खटला असा आयुष्य भर चालत रहातो म्हणून तर त्याला " खटला" म्हणत नसावेत ना...
    पहिल्या वाचनात शासन निर्णय समजला तर तो जी आर तयार करणाऱ्याना म्हणे देह दंड होतो...म्हणून तो दुर्बोध असावा असा नियम आहे म्हणतात. बरं जी आर येताना संदर्भाचे भालदार चोपदार सोबत घेऊन येतो... बर जी आर च्या शेवटी मानकरी असतातच..
    मला तर जी आर वाचताना लग्नपत्रिकेचा भास होतो. नवरा नवरीची नावे सोडली तर ज्यांना प्रति द्यायच्या आहेत त्यांची नावे..मुलीचा मामा, मुलीचा काका अशी वाटतात . आणि शेवटची कार्यालयिन नस्ती वगैरे तर आमच्या ताईंच्या लग्नाला यायचं हं या प्रकारातली वाटते...
     ज्या अर्थी... 
     जि आर हे फार अगम्य असतात 
     त्या अर्थी ते वाचण्यासाठी नसतात.
     ते फाईलला लावून ठेवण्यासाठीच असतात

- प्रशांत शेलटकर
   8600583846

No comments:

Post a Comment

नियती..

आपली स्वप्ने नियती कडून सेन्सॉर व्हावी लागतात..तरच ती  प्रत्यक्षात येतात.. नियती दुःख देते कारण माणूस फक्त सुखाची मांडणी करत बसतो..कुठल्या त...