Ad

Saturday 4 December 2021

आभास-लेख

आभास....


इतिहासाविषयी आपण केवळ अंदाज करू शकतो. कारण आपण त्या काळात अस्तित्वातच नव्हतो.लॉजीकली विचार केला तर , काळाला ब्लॅक अँड व्हाइट या दोनच शेड नसतात.त्याला अनेक रंग असतात. त्यातले ठराविक रंग उचलून काहींनी लेखन केलेलं असू शकते. त्यांच्या लेखनातून एकच शेड दिसण्याची शक्यता असते. शिवाय व्यक्तिगत अनुभव सुद्धा खूप प्रभाव टाकतात .
     त्या काळातील ज्या काही तार्किक आणि वैज्ञानिक  कसोट्या वापरून लेखन केले असेल त्या कसोट्या आज असतीलही किंवा कदाचित कालबाह्य झालेल्या असतील. 
 म्हणून आपण ते ग्रंथ केवळ संदर्भ म्हणून वापरले पाहिजे. आजच्या काळाशी ते सुसंगत आहे का ते पाहिले पाहिजे. नाहीतर नवा ग्रंथप्रामाण्यवाद जन्म घेतो.अंधश्रद्धा या केवळ धार्मिकच असतात असे नाही.त्या पुस्तकीपण असू शकतात.कोणाच्या बुद्धिमत्तेचे दडपण असणे हे चुकीचेच असते.
      कोणत्याही सामाजिक चळवळीत सहभागी होणे हे नक्कीच स्पृहणीय. पण असे सामील होताना स्वतःचा मेंदू शाबूत ठेवणे अत्यन्त महत्वाचे ..चळवळ ही प्रवाही हवी, साच्यात अडकली की तिचेच एक कर्मकांड होते. आणि दुसरे असे होते की मग सामाजिक कामाचाच अहंकार होतो. काम करण्याचे प्रत्येकाचे मार्ग वेगळे असतात .पण आपलाच मार्ग योग्य आहे असे समजणे अहंकाराचे लक्षण आहे. काही तथाकथित सामाजिक कार्यकर्त्याची सोशल मिडियावरची भाषा पहिली की माणसाचा बौध्दिक अहंकार कोणत्या पातळीपर्यंत जातो ते लक्षात येते.
       आपल्याकडे विद्वान म्हणजे ज्यांनी जास्तीत जास्त पुस्तके वाचली आहेत ते विद्वान अस समजण्याचा एक गैरसमज आहे. हे असे तथाकथित विद्वान ,अमुक ढमुक लेखक अमक्या ढमक्या पुस्तकात अस म्हणाले आहेत, असे संदर्भ देऊन आपल्या विद्वत्तेचे दाखले देत असतात. पण अमुक तमुक हे विद्वान आहेत  त्यांनी जरी ते मागच्या शतकात सांगितलं असले तरी ते विद्वान असल्यामुळे त्यांचे संदर्भ वर्तमानात  देणे म्हणजे मूर्खपणा नव्हे काय? 
त्यानी त्या काळात केलेले परिस्थितीचे आकलन त्या काळात बरोबर असेलही पण ते आजच्या परिस्थितीला जसेच्या तसे लागू करणे हा वैचारिक अंधपणा झाला.
       दुर्दैवाने आज आपल्याकडे अशा परपोशी बांडगुळा ची संख्या बेसुमार वाढली आहे. त्यामुळे मूळ ज्ञानवृक्ष झाकोळून गेलाय.. हे भीतीदायक आहे. अज्ञानी असणे एक वेळ ठीक आहे पण ज्ञानाचे भास होणे जास्त धोकादायक..ती एक नशाच असते..

          -प्रशांत  शशिकांत शेलटकर
            8600583846

No comments:

Post a Comment

इथे पुन्हा जन्म नको..

इथे पुन्हा जन्म नको..  सत्कार सोहळा चालू असतो..स्टेजवर दांभिक माणसं बसलेली असतात..आपल्याला माहीत असतं की हे सगळे चोर आहेत..तरी देखील आपण हात...