वैधानिक सूचना-केवळ मनोरंजन हेतू,अंधश्रद्धा प्रसाराचा उद्देश नाही..
झपाटलेला वड...
© लेखक- प्रशांत शेलटकर
" ...त्या वडाच्या झाडावर म्हणे अतृप्त आत्मे असतात..अवेळी वडाखालून जे जातात..ते म्हणे झपाटतात..अवेळी म्हणजे केवळ रात्री नव्हे बरं का..भर दुपारी पण त्या वडाने लोकांना झपाटवले होते म्हणतात...
मरो आपल्याला काय..माझा काय त्याच्यावर विश्वास नाहीये..म्हणे अतृप्त आत्मे..अस काही नाही ..माणूस मेला की सगळा खेळ खल्लास.. देहच नाही तर अवयव नाही आणि अवयवच नाही तर वासना तरी कुठून?...भंपक लेकाचे.
असो मला जायचं आहे आज तालुक्याला ..या गावात ग्रामसेवक म्हणून आठच दिवस झालेत मला..या आठवड्यात मला फक्त आणि आणि फक्त त्या वडा बद्दल ऐकायला आलंय.. म्हणे झपाटलेला वड..सावध रहा भाऊसाहेब..
झुरळ झटकावा तसा मी तो विषय झटकून टाकलाय..आणि आता मी निघालोय.. बारा वाजून गेलेत..एक ची एसटी पकडायचीय मला..झप झप चालतोय मी..सूर्य डोक्यावर.. उन मी म्हणतंय..सगळीकडे वैशाख वणवा पेटला आहे..मास्तरांच्या दटावणीने पोरं चिडीचूप बसावित तशी सूर्याच्या काहिलीन सर्व झाड झुडपं चिडीचूप..झालीत..पाखरं पण घरट्यात,झाडाच्या पानातपानात चोची घालून दम खात बसलेली..पाया खालच्या लाल वाटेचा फोफाटा झालाय..घाम टिपत टिपत मी चालतोय..आता कुठे लांबून तो झपाटलेला वड दिसायला लागलाय..अजून लाम्ब आहे तसा ..पण दिसतोय..त्याचा विस्तारच आहे ना तसा.. मैलावरून पण दिसतो तो..सगळं वावर वैशाख वणव्यात होरपळत असताना हा आपला हिरवागार..जणू जगाशी देणं घेणं काही नाही..आता तो नजरेच्या टप्प्यात आहे..हाच तो म्हणे झपाटलेला वड..
इतक्यात एक वावटळ वडापाशी तयार झाली आणि क्षणात सगळा धुरळा..पाला पाचोळा शंकूचा आकार घेत गगनाला भिडला क्षणभर पिसाटत वडा समोर नाचला आणि नाहीसा झाला..इतक्या लांबून सुद्धा मला तो दिसतोय.. भयाचा एक सूक्ष्म विषाणू माझा ताबा घेतोय का?
" छे छे ही तर भौगोलिक घटना..यात घाबरायचं काय?..उष्ण हवा वर जाते थंड हवा खाली येते. अभिसरण होत..बस्स भोवरा तयार होतो..मीच माझी समजूत घालत चालतोय.. समजूत? ?मी हा शब्द का वापरतोय.. भयाच्या विषाणूचे म्युटेशन होतय की काय?..विवेकाच्या दरवाजावर भयाच्या थापा ऐकू येत आहेत..तरीही आतल्या विवेकाने जागा सोडली नाही अजून..अतींद्रिय शक्ती वगैरे काही नाही,भूत पिशाच काही नाही, अतृप्त आत्मा काही नाही...माणूस मेला खेळ खल्लास..भूत बित झूठ..केवढ्या मोठयानी बोलतोय ना..अफेन्स वरून मी डिफेन्स वर आलोय काय?
वड आता जवळ आलाय..किती अफाट विस्तार आहे ना याचा.. पारंब्या कुठल्या आणि आणि मूळवृक्ष कोणता तेच कळत नाहीये...याची लक्षावधी पाने किती ऑक्सिजन उत्सर्जित करत असतील ना..आता एकदम गार वाटतय..उन्हातून आल्यामुळे असेल कदाचित.. छान वाटतय..इथे बसावस वाटतय.. वाटतय कशाला बसलोच ना मी..माझ्या नकळत आणि लवंडलोयसुद्धा...वरती असंख्य पाने वरची निळाई रोखून धरत आहेत..तरीसुद्धा पानांची नजर चुकवून आकाशातील निळाई खाली ठिबकतेय..उन्हाचे कवडसे इकडे तिकडे नाचत आहेत..का कोण जाणे नदी काठी बगळा भक्ष्य टिपण्यासाठी एकदम स्तब्ध रहातो तसा हा वड एकदम स्तब्ध झालाय..पानांची सळसळ थाम्बत जातेय..नव्हे थांबलीच...इतर झाडे नॉर्मल आणि हा वड नॉर्मल वाटत नाहीये.. एक अघोर छाया वडाला ग्रासून टाकतेय का..भयाच्या विषाणूचे म्युटेशन मल्टिपल रेशोत वाढतंय.. श्वास वाढत चाललेत माझे..आणि हे काय एक श्वास घेतल्यावर दुसरा श्वास कोण घेतंय? माझ्या उच्छवासा बरोबर दुसराही उच्छवास ऐकू येतोय..बाजूला कोणीच नाही..तरीही माझ्याबरोबर ही श्वासांची आवर्तने कोणाची चालली आहेत..??
क्रमशः
-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment