Friday 11 October 2024

प्रार्थना...

प्रार्थना...

प्रार्थना म्हणजे सदविचारांचे चिंतन अशी व्याख्या स्वामी विज्ञानानंद यांनी केलीय..

सगळ्या प्रार्थना ईश्वराला समर्पित असतात.ज्ञानेश्वर माऊलीचे पसायदान हे देखील ईश्वराकडे म्हणजे विश्वात्मक देवा कडे केलेली व्यापक मानवतेची केलेली प्रार्थनाच आहे..


परंतु केलेल्या प्रार्थना देवापर्यंत पोहोचतात का? देव त्या ऐकतो का?आपले स्वार्थ देवाला का सांगावेत? आणि देव तरी सगळ्यांच्या परस्परविरोधी इच्छा पूर्ण करेल? सगळं काही कर्मगतीने होत असेल तर देव त्यात हस्तक्षेप करील का? मग आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी देवाला का वेठीस धरायचे?
   असे अनेक प्रश्न बुद्धिवादी मनाला पडू शकतात..देव म्हणजे  तुम्ही जे मागाल ते मिळायला मशीन नसते..देव म्हणजे आपल्या मनात आणि बाहेर निसर्गात असलेली  अबोध स्वरूपात असलेली अमूर्त शक्ती..ऊर्जा ...ती फक्त उर्जाच असते, माणसाने तिला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे स्वरूप दिले ते ती स्वतःला अनुकूल किंवा प्रतिकूल आहे या वरून..
   माणूस हा विचार करणारा प्राणी आहे...विचार म्हणजे एक प्रकारची उर्जाच..विचार करताना मेंदूच्या काही पेशी ऍक्टिव्ह होतात..जसा विचार केला जातो तसा परिणाम आपल्या शरीरावर होतो तसाच आपल्या मानसिकतेवर आणि बाहेरच्या वातावरणावर होतो तसेच सहवासातील माणसांवर होतो. 
    ज्यावेळी माणूस ध्यान करत असतो ,त्यावेळी अल्फा वेव्हजचे उत्सर्जन मेंदू करत असतो या पॉझिटिव्ह वेव्हज असतात.
   सगळी माणसं शरीराने वेगवेगळी असली तरी ती एकमेकांशी कनेक्ट असतात..केवळ माणसं नव्हे तर प्राणी, पक्षी, वनस्पती, निर्जीव वस्तू एकमेकांशी कनेक्ट असतात..याचे कारण चेतन.. आपण सर्व त्या वैश्विक चेतनेचे पार्थिव आविष्कार आहोत..
    ज्यावेळी माझ्या मनात सकारात्मक विचार येतात त्यावेळी माझ्या मेंदूतून उत्सर्जित होणाऱ्या लहरींची फ्रिक्वेन्सी आणि नकारात्मक विचार करताना उत्सर्जित होणारी फ्रिक्वेन्सी वेगळी असते. ती एकाच वेळी आपल्या शरीरावर परिणाम करते आणि त्याच वेळी भवतालातल्या सेम फ्रिक्वेन्सीला मॅच करते..म्हणून समविचारी माणसे एकत्र येतात
     ज्यावेळी मी म्हणतो की सर्वांचे कल्याण होवो,सर्वांचे भले होवो..सर्व सुखी होवोत..सर्वांना आरोग्य ऐश्वर्य प्राप्त होवो त्यावेळी मेंदूतून ज्या अल्फा लहरी उत्सर्जित होतात त्याचा परिणाम शरीरातील अब्जावधी पेशींवर होतो तसेच तेच विचार आसमंतात प्रक्षेपित होतात..सेम फ्रिक्वेन्सी मॅच होते..त्यातून आपण समविचारी लोकांच्या सहवासात येत जातो..आपल्याला आपसुकच चांगली माणसे भेटत जातात..
    सगळ्या प्रार्थना ईश्वराला संबोधित  केल्या जातात तो ईश्वर सर्व विश्व व्यापून आपल्यात व्यापून राहिलेला असतो.. म्हणजे आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा.. आपल्यातल्या ईश्वराची प्रार्थना करत असतो...आपल्यात ईश्वर आहे ही भावना सुखद नाही का? आणि ती भावना असेल तर आपल्यावर त्या अंतःस्थ ईश्वराचे लक्ष आहे या भावनेने आपण वाइट कर्म करायला धजवणार नाही हा एक वेगळा फायदा..दुसरे असे की जसा आपल्यात ईश्वर आहे तसा तो इतर माणसात आहे ही भावना माणसाला माणसाशी जोडते आणि अधिक व्यापक करते..त्याही पुढे जाऊन ईश्वर सगळ्या चराचरात आहे ही भावना म्हणजेच मोक्ष आहे..जशी जशी अध्यात्मिक प्रगती होत जाते तसा मी पणा कमी होत जातो कारण मी पणा स्वामीत्वाच्या भावनेतून येतो..एकदा देहाचे स्वामीत्व ईश्वराकडे सोपवले की अहंकार संपतो..
     आता एक प्रश्न उरतोच भले आपल्या इच्छा चांगल्या असतील तर त्या ईश्वर पूर्ण कशा करेल? किंवा त्याला वेठीला का धरायचे? कर्माचे फळ ज्याला त्याला मिळतेच मग त्याला देव काय करणार ? अमुक दे ,तमुक दे अस म्हणून खरच तस होणार का?
    याचे उत्तर थोडं वेगळे आहे जसे कर्म तसे फळ ,पण जशी बुद्धी तसे कर्म आणि जशी कर्म तशी बुद्धी..असे हे ट्विस्ट आहे..
    आधी बुद्धी निर्माण होते आणि त्यानुसार कर्म केले जाते ही एक बाजू ,आणि जशी कर्म केली जातात तशी बुद्धी होत जाते..ही दुसरी बाजू  म्हणून सज्जनांच्या संगतीत बुद्धी आणि कर्म दोन्ही चांगली होतात..
    ज्यावेळी मी मनापासून मी म्हणतो की हे ईश्वरा ( अंतःस्थ ईश्वर) सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे,सर्वांचे भले कर ,कल्याण कर, सर्वांना सुखात ,आनंदात ,ऐश्वर्यात ठेव ..आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे..ही प्रार्थना नीट वाचल्यास असे लक्षात येईल की यात एकही शब्द नकारात्मक नाहीये.. प्रत्येक शब्द पॉझिटिव्ह आहे.. शब्द एकटे येत नाहीत ते भावना घेऊन येतात..आणि ते शरीरावर परिणाम करतात..चिंच म्हटलं की तोंडाला पाणी सुटते..भूत म्हटलं की अंगावर शहारा येतो..तसे सुख ,आनंद ऐश्वर्य हे शब्द पॉझिटिव्ह भावना घेऊन येतात..त्यातील प्रत्येक शब्दाला अनेक छटा आहेत. सुखाचे अनेक प्रकार,आनंद अनेक प्रकारचे, ऐश्वर्य बुद्धीचे,धनाचे,शरीराचे पण असतेच..
    ज्यावेळी मी हे शब्द मी उच्चारतो तेव्हा माझ्या शरीरात ल्या असंख्य पेशी पॉझिटिव्ह एनर्जीने भारल्या जातात..आणि जेव्हा मी प्रार्थनेचे सुरुवात हे ईश्वरा अशी करतो तेव्हा मी माझ्या अंतस्थ ईश्वराला साद घालतो.. त्याच्या साक्षीने माझी सगळी कर्मे करतो तेव्हा माझी कर्मे सुधारतात त्याचवेळी बुद्धी सुद्धा सदबुद्धित रुपांतरीत होते..सुख डोक्यात जात नाही आणि दुःख टोचत नाही.कारण आतला साक्षी जागा असतो..
     अनेकांनी एकाच वेळी केलेली प्रार्थना समगती स्पंदन अर्थात रेझोनान्स तयार करते आणि त्याचा इफेक्ट शतगुणीत होतो..
     जाता जाता....

शंकर म्हणतो तथास्तु म्हणजे काय याचा अर्थ परवा परवा पर्यन्त लागत नव्हता..शंकरच का विष्णू किंवा गणपती किंवा अन्य देव का नाही?
     विचार करता करता सहज उत्तर मिळून गेलं...शंकर म्हणजे अंतर्मन..सबीकॉन्शस माईंड..शंकर जसा देव आणि दानव असा भेद करत नव्हता जो त्याची भक्ती करतो त्याला तथास्तु म्हणत होता तसेच आपल्या अंतर्मनाला चांगले वाईट कळत नाही ते तथास्तु म्हणत जाते..देवांचा देव महादेव जसा शक्तिमान तसे कॉन्शस माईंड च्या अनेक पट सबकॉन्शस माईंड शक्तिमान..
म्हणून शंकर म्हणतो तथास्तु..

सर्वांचे कल्याण होवो..

तथास्तु... शुभम भवतु..

-प्रशांत शेलटकर..

No comments:

Post a Comment