Saturday 9 March 2024

समांतर

समांतर...


मी....
सुखातला नास्तिक
आणि दुःखातला आस्तिक 
तरीही तिच्या निरुपद्रवी श्रद्धेपुढे,
मी नतमस्तक ...

माझी बायको..
सार्वकालिक आस्तिक
माझ्या लॉजीकमध्ये
बसत नाही तिचे आस्तिकत्व
माझ्या सडेतोड प्रश्नांना
नसतात तिच्याकडे उत्तरे..
पण उत्तरादाखल 
ती फक्त देवा समोर हात जोडते
समाईचा मंद प्रकाश..
तिच्या चेहऱ्यावर पसरलेला असतो
तिचे मंद स्मित..जोडलेले हात
माझे लॉजिक पार विरघळते..

लॉजीकली जिंकलो तरी
तिच्या सारखा निरागस
हसलो नाही मी कित्येक दिवस
तीर्थाने ओला झालेला हात
ती अलगद फिरवते केसातून
आणि गोड हसून म्हणते
" हा घ्या प्रसाद..."

तेव्हा मी माझ्यातला नास्तिक
शाबूत ठेवून 
सलाम करतो तिच्या
निरागस अस्तिकतेला..
मला आहे ना अधिकार
माझे नास्तिकत्व जपायचा
मग तिला का असू नये
हक्क तिचे आस्तिकत्व जपण्याचा

प्रश्न तर संपत नाहीत..
आणि उत्तरे अमर नाहीत
प्रश्नांना वळसे घालून
पुढे जाणे पटत नाही..
प्रश्नांचे दंश सहन करीत
एक अस्वस्थ आयुष्य..
पुढे सरकत रहाते..
आणि त्याला समांतर
तिची अफाट श्रद्धा
चालत रहाते चालत रहाते..
क्षितिज पुढे पुढे जात रहाते..
पुढे पुढे जात रहाते..


@ प्रशांत

No comments:

Post a Comment