Saturday 18 March 2023

व्यक्ती स्वातंत्र्य



प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असते.पण त्यांचा समुदाय बनला की बंधने येतात. परस्परांच्या गरजा भागवताना व्यक्तिगत स्वातंत्र्याला थोडी मुरड घालावी लागते.जो पर्यंत आपल्या देशात कृषी संस्कृती होती तोपर्यंत समाज एकसंघ होता एकमेकांच्या गरजा भागवणे एकमेकांवर अवलंबून असल्याने इच्छा असो वा नसो एकत्र रहावे लागत होते. व्यक्तीगत स्वातंत्र्याचा संकोच , नाविन्याचा अभाव हे दोष असले तरी व्यक्तीला सुरक्षा होती.
    आज प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे.कारण आर्थिक शक्ती आणि त्यामुळे इतरांवरचे अवलंबित्व कमी होत गेलं आहे. आर्थिक ताकद असल्याने खूपशा गोष्टी सहज मॅनेज होतात. पण त्याच बरोबर इगो तिखट होत गेला आहे.मी आणि माझं यात गुंतत चाललो आहोत आपण.
    मी आणि माझं विश्व यात कोणी यायचं हे मी ठरवणार.इतरांशी देणे - घेणे नाही. इतरांशी बॉंडिंग असण्याचा प्रश्नच नाही कारण बॉंडिंग ज्यासाठी करतात ते कारणच संपूष्टात आलें आहे..न मला तुझ्याकडून हवंय ना मी तुला काही देणार.लग्न सुद्धा अगदी प्रोफेशनल व्ह्यू ठेऊन जमवली जातात.त्यात गैर अजिबात नाही. व्यक्ती स्वातंत्र्य ही समाजाची परमोच्च पातळी असते.
     पण सर्व समाजाचा विचार केला तर व्यक्तिस्वातंत्र्याच सर्वोच्च यश काही समुदायानी प्राप्त केले आहे.पण काही समुदायांचा प्रवास उलट्या दिशेने चालू आहे. अजूनही त्याना वाटते पृथ्वी सपाट आहे. विशेष म्हणजे हे समुदाय व्यक्ती स्वातंत्र्य मानत नाहीत तरी त्यांची संख्या वाढत आहे. 
     स्वतंत्र विचारशक्ती असलेला समुदाय झपाटयाने कमी होतोय. आणि झुंडीची मानसिकता वाढत जातेय. व्यक्तीस्वातंत्र्य जपणारी माणसे स्वतःभोवती एक वर्तुळ आखून सेफ रहाणे पसंत करतात. त्यामुळे झुंड आली की एकाकी पडतात आणि संपून जातात. सर्व भल्या बुऱ्या गोष्टी माणसाच्या अस्तित्वाशी येऊन थाम्बतात. व्यक्ती स्वातंत्र्य वगैरे गोष्टींना तुमचे अस्तित्व शिल्लक राहिले तरच   महत्व आहे.
       व्यक्ती स्वातंत्र्य जपायचे तर समविचारी व्यक्तींनी एकत्र येणे आवश्यक असते.पण एकत्र आल्यावर व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच करावा लागतो .अशी गंमत असते. कम्युनिस्ट लोक मार्क्सवादी, लेनिनवादी,रॉयवादी अशा विविध गटात विभागले जातात . भारतात सुद्धा कॉम्रेड डांगे हे नंतर बाजूला फेकले गेले. ही फक्त उदाहरण दिली आहेत. प्रत्येक क्षेत्रात हेच आहे.प्रखर बुद्धिवादी एकत्र येत नाहीत.पण मंदबुद्धी चटकन एकत्र येतात.
      शेवटी व्यक्ती स्वातंत्र्य ही बाब उच्च मानवी मूल्य जपणारी असली तिचे अस्तित्व मंदबुद्धी मिटवू शकतात.

- प्रशांत शेलटकर

No comments:

Post a Comment