Monday 27 December 2021

जिंदादिल जिंदगी

जिंदादील जिंदगी...

कपाळावर एक आठी
असायलाच हवी...
हसत सतत राहिलो तर
 किंमत म्हणे होते कमी

हसतो जो नेहमीच
म्हणे प्रॉब्लेमच त्याला नाही
आयुष्य कसे जगावे
म्हणे याला कळतच नाही

हसतो हा नेहमीच
म्हणजे हा खुशालचेंडू आहे
ताटात याच्या नेहमी
म्हणे बुंदीचाच लाडू आहे

म्हणे आयुष्य गंभीर घ्या
तरच तुम्ही मॅच्युअर्ड
खतरुड चेहरा म्हणजेच
जणू यशाचा पासवर्ड

लग्नातही यांच्या ते
असे काही हसतात
शुभेच्छा घेतानाही ते
मोनालीसा दिसतात

रडका चेहरा करून का
आयुष्य बदलणार आहे ?
कितीही आपटली तरी
सगळच का मिळणार आहे ?

कित्येक राजे आले गेले
हिशेब त्यांचा नाही
कालचक्राच्या गतीचा
अंदाज कुणाला नाही

आज मेल्यावर जग उद्या
सगळं काही विसरणार
भिंतीवरच्या फ्रेम मध्ये
तूम्ही अडकून पडणार..

जगाचे सोडून द्या हो
घरच्यांचे काय..?
आठवण तुमची काढून
त्यांचे पोट भरणार काय?

म्हणून जस आहे तस
आयुष्य जगुन घ्यावं
झाडावरच फुल अगदी
डोळे भरून पाहून घ्यावं

सकाळचा सूर्य कधी
डोळ्यात साठवून घ्यावा
ऐन वैशाखात कधी
श्रावण आठवून घ्यावा

शरीर जगवायला मित्रा
एक निरंतर श्वास लागतो
तसच आयुष्य जगायला
आनंदाचा ध्यास लागतो

पैसा अडका सोन नाणं
माया तर मुळीच नाही
पण सिद्ध करायला स्व ला
तेवढंच काही पुरेसे नाही..

जन्म ते मृत्यू  मित्रा ,
हा एक प्रवास आहे
 जिंदगी जगावी जिंदादिल
असाच तो एक ध्यास आहे

-प्रशांत शेलटकर
8600583846

No comments:

Post a Comment