Monday 24 June 2019

बे कं बे

बे कं बे..

लहानपणी आम्ही बेंबीच्या देठापासून बे एके बे पासून तीस दाहे तीनशे पर्यंत पाढे म्हणायचो नाही बोंबलायचो..समोर अंकलिपी असायची त्यावर अंकात आणि अक्षरांत पाढे असायचे किंवा वर्गात असलो तर समोर तक्ता असायचा *गुर्जी* किंवा *बाई*  छडीचे एक टोक आकड्यावर आणि नजर मुलांवर ठेवून पाढे म्हणून घ्यायच्या..
     बे पासून  सुसाट सुरू  झालेली गाडी..दहा पर्यंतची फास्ट लोकल एकवीस नंतर धीमी लोकल व्हायची.  एकोणतीसच्या पाढयाला तर गचके देत चालायची...परत तीस ला सुसाट सुटायची ती तीनशेला तर थेट यार्डात जाऊनच थांबायची..मज्जा यायची..
    मधली काही स्टेशन्स तर खूप रंजक असायची ...बारो दरसे तर रंगबरसे सारखे वाटायचे..तिहोत्रिदोन हे मराठी वाटायचेच नाही..काहीतरी अगम्य वाटायचे..सर्वात मस्त बे चा पाढा..म्हणजे दोनचा पाढा. या पाढ्याला जी लय असायची ती कुठल्या गाण्याला पण नसेल..
बे एके बे नाही तर बे कं बे
इथून जी सुरवात व्हायची ती आरोह अवरोह करीत साता पर्यंत आलो की बे आठी असे सरळ न म्हणता पाण्यात डुबकी घ्यावी तशी बे आss ठी ची डुबकी घ्यायची आणि पुढे जायचं...गंमत होती ती..
   तेवीस, सत्तावीस आणि एकोणतीस चे पाढे हे  पाढयातले अनुक्रमे खविस, मुंजा आणि वेताळ होते..लय छळायचे...त्यातले सत्ते , अठ्ठे, नव्वे बापजन्मांत आले नाहीत.. का कोण जाणे पण  पाच, वीस ,पंचवीस हे पाढे मित्र वाटायचे..
    एकट्याने पाढे म्हणणे कंटाळवाणे असायचे..पण वर्गात एका लयीत पाढे म्हणताना समाधीच लागायची..एक छुपा फायदा म्हणजे एकोणतीस च्या       पाढयाला फक्त तोंड आणि शरीर हलवलं तरी पुरेसे असायचे..आपण फक्त जगन्नाथाच्या रथाला हात लावायचा...बस्स

    पण आज कळतं त्यातलं विज्ञान...सर्वानी एकाचवेळी पाढे म्हणण्यामुळे.. जे समगतीस्पंदन (रेझोनान्स) तयार व्हायचा त्याचा फायदा सर्वानाच मिळायचा.एकाच वेळी दृकश्राव्य पद्धतीने म्हणजे एकाच वेळी संख्या पाहून तिचा उच्चार केल्याने ती  डोळ्याद्वारे थेट मेंदूवर कोरली जायची. त्यामुळे आज ७२ म्हटले तर बहात्तर ही अक्षरे लगेच झळकून जातात..कुठेही अजिबात गोंधळ द्विधा होत नाही..माझ्या अगोदरच्या पिढी त गणकयंत्र न वापरता केवळ नजरेवर बेरीज करणारी माणसे होती..
      मेंदूची क्षमता अफाट आहे.तो प्रथम वापरात येताना थोडा त्रास होणारच.त्याला घाबरून जर तो वापरात आणलाच नाही तर सगळंच अवघड वाटतं..
     माझ्या माहितीप्रमाणे शाळेत सामूहिक पाढे म्हणणे बंद झालं असावं किंवा ते रुक्ष पद्धतीने म्हणजे बारोदरसे ऐवजी एकशे बारा, त्रिहोत्रिदोन ऐवजी दोनशे तीन असे म्हटले जात असावे. सायंटिफिक दृष्टीने ते एकशे एक टक्के बरोबर आहे.पण पाढे म्हणण्यातले सौन्दर्य.. त्याची लय.. त्यातला आनंद कुठेतरी हरवला आहे असं वाटतं.. म्हणून तर मुलांना गणित कठीण वाटत नसेल ना...
    थर्टीन... थर्टी...फॉरटीन.. फॉरटी यातला सूक्ष्म फरक जर मुलांना जर कळत असेल तर मराठीतले आकडे का समजू शकत नाहीत..कदाचित  इंग्रजीतुन शिकणे म्हणजे प्रतिष्ठेचे..आणि मराठी म्हणजे कुठली तरी मागास अडाणी भाषा हा पालकांचा समज पाल्यात झिरपत आला असेल . म्हणून गणिती संकल्पना समजत नाहीत असे तर नसेल ना?
     मी काही शिक्षणतज्ञ नाही.पण जुने ते सर्वच टाकाऊ नसते..आणि नवीन ते नेहमीच निर्दोष असते असेही नाही. असं माझं मत आहे.
     काळा नुसार नक्कीच बदललं पाहिजे..पण एखाद लहान मूल थंडीत उघडं बसलंय ..ते थंडीने कुडकूडतय तर त्याच्या अंगावर कपडे घालाल की बाजूच्या मुलाला नागड करून त्या थंडीने कुडकूडणाऱ्या मुलाच्या बाजूला बसवाल?

-प्रशांत शेलटकर
  8600583846

No comments:

Post a Comment