Wednesday 17 July 2024

माया..

माया म्हणजे नेमकं काय?...

आध्यत्मिक क्षेत्रातील माणसांच्या तोंडून माया हा शब्द ऐकायला येतो..जग ही माया आहे,संसार ही माया आहे, कुटुंब ,बायका मुले ही माया आहे..असे अनेक जण अनेकवेळा सांगत असतात..पण नेमकी माया म्हणजे काय.. गंमत म्हणजे प्रेमाचा समानार्थी शब्द पण माया असाच आहे. माया या शब्दाला इंग्रजी शब्द illusion अस आहे. 
       जे खरे वाटते पण खरे नसते ती गोष्ट म्हणजे माया..युधिष्ठिराला एकदा प्रश्न विचारण्यात आला की जगातलं सर्वात मोठं आश्चर्य काय? या प्रश्नाचे उत्तर देताना युधिष्ठिर म्हणतो, की आजूबाजूला मृत्यू घडत असतानाही माणसाला वाटत की ती वेळ माझ्यावर येणारच नाही हेच जगातलं सर्वात मोठं आश्चर्य..माया म्हणतात ती हीच..
    आता सायंटिफिक दृष्टीने पाहू..जेव्हा एखादी वस्तू आपण पाहतो तेव्हा तिचा आकार पहातो .प्रत्येक वस्तू कणांनी बनली आहे.प्रत्येक कण अणू -रेणुनी बनलेला आहे रेणूपेक्षा अणू सूक्ष्म .अणूचेही तीन भाग प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन..आणि हे इलेक्ट्रॉन स्थिर नसतात ते अणुकेंद्राभोवती वेगाने फिरत असतात.आता ही रचना प्रत्येक सजीव आणि निर्जिबाची असतेच. 
    साध्या डोळ्यांनी जेव्हा आपण खुर्ची पाहतो तेव्हा त्याचा निर्जीव आकार पहातो. सगळी खुर्ची जर सूक्ष्म दर्शकाखाली पहिली तर तिचा मूळ आकार जाऊन ती अणुनी बनली आहे आणि ती गतिमान दिसेल.केवळ खुर्चीच नव्हे तर सगळ्या निर्जीव वस्तू गतिमान दिसतील..
     जी गोष्ट निर्जीव वस्तू बद्दल तीच सजीवा बद्दल..माणूस सूक्ष्म रूपाने पहात गेलो तर तो सुद्धा कोट्यवधी पेशींनी बनला आहे..जसे जसे त्याला सूक्ष्म रूपाने पाहू तसे त्याचे रूप, रंग,तो स्त्री की पुरुष ह्या बाह्य गोष्टी लय पावून तो देखील अणु रेणुनी बनलेला आहे हे लक्षात येईल.थोडक्यात जसे जसे सूक्ष्मात जाऊ तसे स्त्री,पुरुष,प्राणी,आणि निर्जीव वस्तु यातले भेद नष्ट होवून सगळे जग एकाच मॅटर ने बनले आहे हे लक्षात येइल.. अध्यात्मात त्याला एक समर्पक शब्द आहे तो म्हणजे ..चैतन्य..
      सायन्स पार्टीकल अँड वेव्हज थिअरी मांडते. विश्व म्हणजे इनफिनिट एनर्जी मानते अध्यात्म म्हणते विश्व चैतन्यरूप आहे.सायन्स म्हणते काहीही नष्ट होत नाही ,रूपांतर होते.जसे पाण्याची वाफ होते,वाफेचे पाणी होते, वस्तू जळून कोळसा होतात. जे दिसत नाही ते वायुरूपात वातावरणात साठून राहाते. वस्तूचे आकार नष्ट होतात  पण ऊर्जा नष्ट होत नाही.अध्यात्म सांगत की शरीर नष्ट होते आत्मा नाही.( आत्मा म्हणजे भटकती आत्मा नव्हे..ते कल्पनेचे आणि सिरीयल आणि चित्रपटांचे आणि माणसाच्या मनाचे खेळ आहेत)
    सारांश- जसे दिसते तसे नसते,बघण्याची साधने बदलली की दिसणे बदलत जाते.हीच माया आहे ..मूळ चेतन समजून घेतले की माया नाहीशी होते..भेद नाहीसे होतात मग अवघाची रंग एकच होतो...

- प्रशांत शेलटकर..
-- टीप - लेखाच्या खाली दिलेले माझे नाव ही सुद्धा जगातल्या असंख्य देहांपैकी एक असलेल्या देहाची ओळख आहे..बाकी सगळे माया आहे
    वर उल्लेख केलेल्या सायंटिफिक माहितीत त्रुटी असू शकतात,जर असतील तर क्षमस्व , आणि त्यात सुधारणा स्वागतार्ह

No comments:

Post a Comment