Monday 1 April 2024

भय+कृतज्ञता = देव

भय+कृतज्ञता = देव

निर्सगाचे रौद्र रूप, बेभरवशाची जिंदगी, जो निसर्ग आपले पोषण करतोय तोच कधी तरी आपल्या जीवावर उठतोय ..या सर्व भवतालात भरकटलेल्या माणसाला बुडत्याला काडीचा आधार मिळावा तशी देव नावाची एक शाश्वत काडी सापडली.. एकाच वेळी भय आणि कृतज्ञता याचे विलक्षण मिश्रण असलेली भावना म्हणजे देव...
   आरंभीच्या काळात  त्या भावनेने त्याला मानसिक स्थैर्य दिले..देवाच्या अस्तित्वाचे प्रश्न ,माणूस स्थिर-स्थावर झाल्यावर निर्माण व्हायला लागले.निसर्ग अफाट आणि भव्य आहे..दिवस-रात्रीचे चक्र अखंड चालू आहे, त्यात काहीतरी नियम आहेत..आपण आपली नित्य कामे करत असतो तसेच ही निसर्गाची कामे कोण करत असेल ? हा प्रश्न माणसाला पडला, त्याचा भवताल हा चल होता ,अस्थिर होता, जे चल आहे त्याला कोणीतरी चालवत आहे असा बेसिक विचार त्याच्या मनात येऊन गेला असेल..जो चालवतोय पण दिसत नाहीये तो वादळे निर्माण करतोय, विजा चमकवतोय, पाऊस पाडतोय ,त्याने असे प्राणी निर्माण केलेत की जे आपल्याला खाऊ शकतात ..या सर्वातून त्याच्या विषयी भय निर्माण झाले ..पण त्याच्याचमुळे आपले पोषण होतंय, मातीतून धान्य देतोय, पाणी देतोय ,यातून त्याच्या विषयी कृतज्ञता निर्माण झाली..
       पण ती निराकार शक्ती समजून घ्यायला अवघड म्हणून त्याने  तिला साकार रूप दिले..साकार करतानाही तिला मानवी रूप दिले ते  ती शक्ती समजायला सोपी म्हणून आधी पाषाण मग त्याच्या मूर्ती झाल्या.. पाषाणच का? तर तो स्थिर असतो, दीर्घकाळ टिकतो, तो जळत नाही..
      मग आपल्या भय आणि कृतज्ञतेच्या भावनेचे प्रोजेक्शन त्या मूर्तीवर करणे चालू झाले, भय भावना त्रासदायक असते, ती शेअर केली की मनावरचा ताण कमी होतो.देवापुढे हात जोडले की मन शांत व्हायला लागलं कारण भय नावाच्या ओझ्याला कोणीतरी शेअर करणारा मिळाला 
     कृतज्ञता ही पॉझिटिव्ह भावना आहे ती व्यक्त केली की ऊर्जा मिळते. म्हणून माणसे देवापुढे हात जोडायला लागली..
      पुढे मूर्ती सुबक झाल्या त्यांची देवळे झाली.पण कृतज्ञता आणि भय या भावना कायम राहिल्या.. त्यात भय ही बेसिक भावना असल्याने "देव" टिकून राहिला.. आणि टिकून राहील..
      देव कृपाही करत नाही आणि कोपही करत नाही हा विचार जसा दृढ होत जाईल तसा देव रिटायर होईल की कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माणूस त्याचे कायम ठेवील ? या प्रश्नाचे उत्तर काळाच्या उदरात लपले आहे..

@ प्रशांत शेलटकर

No comments:

Post a Comment