Tuesday 19 September 2023

अंधश्रद्धा

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आपले नाव बदलून कुप्रथा निर्मूलन समिती असे ठेवणे उचित ठरेल असे मला नम्रतेने वाटते. समितीने अनेक समाजविघातक कुप्रथा बंद केल्या आहेत. आज पर्यंत काम उत्तम केले आहे..पण नाव शब्दशः पटत नाही . 
     श्रद्धा म्हणजे प्रचलित वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विरोधात  जाऊन एखाद्या व्यक्ती किंवा घटनेवर ठेवलेला विश्वास.हा विश्वास कार्यकारण भावाच्या तत्वावर अवलंबून नसतो.तो तर्क कसोट्या लावून ठेवलेला नसतो. तो तर्काच्या विविध चाळण्या वगळून थेट ठेवला जातो.प्रचलित वैज्ञानिक दृष्टिकोन हा शब्द यासाठी वापरला आहे की जसे जसे विज्ञान पुढे सरकत जाते तसे तसे त्याचे निकष बदलत जातात. निसर्गाची कोडी उलगडत जातात. सुरवातीला अणू हा पदार्थाचा सूक्ष्मतम भाग मानला जायचा नंतर कळले की अणूचे सुद्धा प्रोटॉन,इलेक्ट्रॉन असे अधिक सूक्ष्म भाग असतात. अशा प्रकारे विज्ञान पुढे पुढे सरकत जाते. भविष्यात विज्ञान स्वतःच कदाचित ईश्वराचे अस्तित्व मान्य करेल.पण प्रचलित वैज्ञानिक निकषात ईश्वराचे अस्तित्व नाही. आणि ते  वैज्ञानिक परिघात खरे आहे.
    पण श्रद्धेच्या प्रांतात ईश्वर आहे हा विश्वास आहे.मग तो मूर्तीरूपात असो ,अल्लाह असो वा आकाशातला बाप असो..यात श्रद्धा आहे. अंधश्रद्धा हा शब्द मला वाटत समितीनेच निर्माण केला असावा. ज्या वेळी समिती स्थापन झाली त्यावेळची एकूण सामाजिक परिस्थिती पाहता श्रद्धा आणि अंधश्रद्धा असे दोन काल्पनिक गट करणे समितीला योग्य वाटले असावे.ज्या काही समाज विघातक रूढी ,परंपरा आहेत त्या सर्व अंधश्रद्धा या गटात टाकण्यात आल्या असाव्यात. त्या काळात ते योग्यच होते. देवदासी सारखे प्रश्न समितीने प्रभावीपणे सोडवले.
    पण नावाचा विचार केला तर त्यात एक प्रकारचा विरोधाभास आहे..वैज्ञानिक निकष लावले तर प्रत्येक श्रद्धा अंधच म्हणायला हवी. जरी श्रद्धेचे श्रद्धा आणि अंधश्रद्धा असे दोन प्रकार केले तर श्रद्धा ठेवणे हे सुद्धा विज्ञान विरोधी आहे फक्त अंधश्रद्धा नव्हे. इतरांना आणि स्वतःला उपद्रव देणारी श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा  असे मानले तर व्यक्तीला आणि समाजाला मानसिक आधार देणाऱ्या श्रद्धेबद्दल समितीचे मत काय आहे. या श्रद्धेला विरोध नसेल तर मग प्युअर वैज्ञानिक दृष्टीकोनाचे काय? मानसिक आधार देणारी, देवावरील सकारात्मक श्रद्धा समितीला मान्य असेल तर विज्ञान सध्यातरी देव मानत नाही. भविष्यात ते तसेच राहील असे मानायचे पण कारण नाही. 
     पण सध्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे नाव बदलून कुप्रथा निर्मूलन समिती असे नाव दिल्यास ते अधिक अचूक होईल असे वाटते.
   टीप- माझी शंका फक्त नावासाठी आहे, समितीच्या कामाला नाही.

-प्रशांत शेलटकर

No comments:

Post a Comment