Wednesday 2 August 2023

कापूस कोंडा

कापूस कोंडा...😊

ज्याच जसं आकलन
तसं त्याच जग..
कधीतरी खोल उतरून
मना मध्ये बघ..

दिसेल कोणाला साप
दिसेल कोणाला दोरी
उजेड अंधार खेळ सारे
दिसेल त्याच्या परी...

श्वान ऐकतो अनाहत
घुबड बघते अंधारात
अजून काय काय आहे
निसर्गाच्या पुस्तकात

लुकलूकतो बघ काजवा
कोण त्याला देतो प्रकाश
सुरवंटाचे होते फुलपाखरू
मिळता  जरा अवकाश

दिवस उगवतो नेमाने
नेमाने येते रात्र
वर्षांनुवर्षे  चालते वेड्या
दिवस-रात्रीचे अखंड सत्र

तरी तुला वाटते वेड्या
तुलाच सगळे कळते
सांग बरं त्या सूर्याची
धुनी अखंड का जळते

बिग बँगच्या अगोदर
काय बर होते?
अस्तित्वात नाहीच त्याला
नाव काय बरे होते?

नाही नाही म्हणताना
कशास नाही म्हणायचे
अस्तित्व नाकारताना ते
नकळत मान्य करायचे?

कापूसकोंड्याची गोष्ट
परत परत घडत असते
कधी उत्तरात प्रश्न तर 
कधी प्रश्नात उत्तर असते

-प्रशांत शेलटकर
 8600583846

No comments:

Post a Comment