Monday 21 November 2022

आता थाम्ब..

आता थांब...

कुठे थांबायचं ते कळलं पाहिजे
वेळीच माघारी  वळल पाहिजे..

कधी काळी होतो आपण
कुणाचे ना कुणाचे तरी..
आता मात्र कुणाचेच नाही
हे वेळीच उमगलं पाहिजे
कुठे थांबायचं ते कळलं पाहिजे
वेळीच माघारी  वळल पाहिजे.. 

कलंदर आणि बिलंदर
आयुष्यात भेटायचेच
गोड बोलून गळा कापणारे
कुणीतरी असायचेच
कलंदर कोण ? बिलंदर कोण?
वेळीच हे समजले पाहिजे
कुठे थांबायचं ते कळलं पाहिजे
वेळीच माघारी  वळल पाहिजे..

प्राधान्य क्रम असतात ना 
प्रत्येकाचे वेगळे वेगळे
सोयीनुसारच वागतात ना
ते  सगळे सगळे
सालं लोकांच्या मनात नेमकं काय
ते एकदा समजलं पाहिजे
कुठे थांबायचं ते कळलं पाहिजे
वेळीच माघारी  वळल पाहिजे..

लोक पण इतके हुकमी वागतात
कधी उंटासारखे तिरपे चालतात
कधी अडीचकीचे घोडे बनतात
कधी तर प्यादालापण चाल देतात
आपण कोण उंट घोडे की वजीर 
हे क्लिअर कट समजलं पाहिजे
कुठे थांबायचं ते कळलं पाहिजे
वेळीच माघारी  वळल पाहिजे..

हसरे मधाळ मोहक  वगैरे वगैरे
असतात म्हणे हल्ली चेहरे
आणि कित्येकदा असतात ना
आपल्यावर अदृश्य पहारे..
हे चेहरे आणि ते पहारे
एकदा समजून घेतले पाहिजे
कुठे थांबायचं ते कळलं पाहिजे
वेळीच माघारी  वळल पाहिजे..

गर्दीचेच व्यसन असते आजकाल
बुळबुळीत माणसाची गर्दी
मूळमूळीत माणसांची गर्दी
पिचकलेल्या माणसांची गर्दी
विचकलेल्या माणसाची गर्दी
भरकटलेल्या माणसांची गर्दी
विस्कटलेल्या  माणसांची गर्दी
आणि पिंडाभोवती जमलेल्या 
खरकट्या कावळ्याचही गर्दी
साली ही गर्दीची नशा 
एकदातरी समजली पाहिजे
कुठे थांबायचं ते कळलं पाहिजे
वेळीच माघारी  वळल पाहिजे..

-प्रशांत शेलटकर
  8600583846

No comments:

Post a Comment