Monday 7 March 2022

सांजरंग..

सांजरंग...

मी आहे असाच ..
एक विस्कटलेला चित्रकार
इथे तिथे पसरलेला
तूच मला ठेवतेस आवरून
कधी रागाने कधी प्रेमाने..

कधी अवचित धक्का लागून 
रंग सांडले जर कॅनव्हास वर...
तर त्या विखुरलेल्या रंगातही
तूला चित्र दिसतं...होय ना!
म्हणतेस रंगसंगती छान जमलीय
अन गंमत म्हणजे ..
न दिसणारे रंगही तुला दिसतात

अग माझ्या रंगपेटीत
फार रंग नव्हतेच कधी
ते ही आता संपत आलेत
पण तुला ना त्याची खंत
म्हणे एखादी अजून एक शेड
जमून जाईल बघ
त्या उरलेल्या रंगात...

डोळ्यात दाटून आलेले
रंगहीन पाणी ....
रंगेबेरंगी होत तेव्हा...
अर्धा अधिक कोरा कॅनव्हास
रंगांची मिजास करू लागतो
रंगपेटीतल्या मोजक्या रंगाना
लाभते तेव्हा इंद्रधनुचे भाग्य..

आयुष्यातले सांजरंग...
झरझर उतरत जातात कॅनव्हासवर...
मला आता उसंत नसते
रंग किती सरले किती उरले
याची तमा नसते..

शेवटचे चित्र तुझेच आहे ना
सफेद केस...
गालावरच्या सुरकुत्या.. 
अगदी जशाच्या तशा
आता तू अगदी डिट्टो 
वहिदा दिसत्येस ग..
ती ग आपली  वहिदा रहिमान
म्हातारी झाली तरी 
किती क्युट दिसते ना..
बघ ना सेम टू सेम वहिदा...

अरे? हे काय?
अग रडू नकोस ना
रंग ओघळतील ना..
आता सगळे रंग संपलेत ग..
माझं आता आवरलंय..
रंगच उरले नाही बघ..

स्वर्गात तुला भेटायला येताना
हे असे रडके चित्र घेऊन येऊ का?...

रडू नकोस ग ...
अग ए ऐकतेस ना?????
आलोच मी...

-प्रशांत शशिकांत शेलटकर
 8600583846

No comments:

Post a Comment