Friday 17 December 2021

तुला विसराव म्हणते..

तुला विसराव म्हणते ,
पण तू आठवत जातोस

.. एखादं मोरपीस गाला वरून फिरावं..आणि तनमन हळव होऊन जावं तशा तुझ्या आठवणी हळव्या करतात आणि मग  मनाच्या अंगणात 
का बरं असा फुलून येतोस
तुला विसराव म्हणते ,
पण तू आठवत जातोस...

 असा कसा रे तू ..न बोलता खूप बोलून जातोस..पारिजाताचा सडा पडावा ना अगदी तस्साच...तुझ्या मौनाचे अर्थ तरी कसे लावू ? त्यापेक्षा तू घडाघडा बोल...बोलून रिता हो..तुझं मौन मला अस्वस्थ करतं रे..अबोल राहून किती बोलतोस..
तुला विसराव म्हणते ,
पण तू आठवत जातोस

त्यापेक्षा तू भेटलाच नसतास तर
मनाच्या तारा छेडल्याच नसत्या..
मैफिलीचा उगा पसारा मी मांडलाच नसता..मग ही भैरवी अशी अंगावर आलीच नसती..
तू असा दूर राहून , मनाच्या तारा छेडत बसतोस..
तुला विसराव म्हणते ,
पण तू आठवत जातोस...

तुझ्याशिवाय निभावलंय माझं
बघ ना किती छान चाललंय..
हे भरलं घर...प्रेमळ नवरा
गोड मुलं, त्यांचा गोड पसारा..
कशाला हवा तुझा वेडा विचार
पण नाही ,तू कुठे माझं ऐकतोयस
तुला विसराव म्हणते ,
पण तू आठवत जातोस

आता पुरे हं....
नको आठवू सारखा..
आता श्रावण संपलाय
अवेळी नको ना येऊस...
आलास तरी असा डोळ्यातून
वाहू नकोस..तू असा गालावर ओघळलास की थेट
 काळजात रुजतोस
तुला विसराव म्हणते ,
पण तू आठवत जातोस

-प्रशांत शशिकांत शेलटकर
 8600583846

No comments:

Post a Comment