Tuesday 30 November 2021

सोनसकाळ..

सोनसकाळ...


पहाट सरली तसे उतरले,
किरणांचे धरेवर  पक्षी
रंगबावरी जणू उषा निघाली
घट मेघांचे घेऊन कुक्षी

सुगंध पेरीत हलका हलका
 मंद मंद हा वाहे वारा..
चुकून थबकला क्षितीजावरती
कुठे एखादा चुकार तारा..

टप टप थेंब अंगावरती
झाडे वेली चिंब चिंब..
तिथे दूर क्षितिजावरती
बालरवीचे उबदार बिंब

ऐकू येती कुठे राउळी
द्विजगणांचे मंत्र सुमंगल
अन आम्रवृक्षी दुज्या द्विजांची 
अखंड चालली मधुर दंगल

जशी कुणी सुस्नात नववधू
तुळशीला घालते पाणी
तशी येते  सोनसकाळ ही
रोजच माझ्या अंगणी...

✍️
-प्रशांत शशिकांत शेलटकर
 गोळप, रत्नागिरी
 01/12/2021
 8600583846

No comments:

Post a Comment