Tuesday 29 June 2021

विश्वातला माणूस की माणसाचे विश्व?भाग-2

विश्वातला माणूस की माणसाचे विश्व?

भाग-2

डोक्यातला प्रगत मेंदू आणि हाताचा अंगठा यामुळे गुहेतील माणूस कच्च्या घरात आला,शिकार सोडून शेती करायला लागला, व्यापार करू लागला , शहर निर्माण झाली, टोळ्यांचे "समाज" झाले. निसर्गाला देव मानता मानता त्याची प्रतीके बनली, प्रतिकांच्यामध्ये स्पर्धा निर्माण झाली, श्रेष्ठत्व ,कनिष्ठत्व निर्माण झाले, देव बाजूला झाले, प्रेषित निर्माण झाले, प्रत्येक प्रेषितांचे वेगळे तत्वज्ञान झाले. त्यांचे अनुयायी निर्माण झाले.त्यांच्यात संघर्ष झाले, रक्तपात झाले,
    मानवी इतिहासाला वेगळी वेगळी वळणे लागत गेली. धर्म आणि विज्ञान यात संघर्ष निर्माण झाले. विज्ञान आपल्या पद्धतीने विश्वाच्या रचनेकडे पाहायला लागले, धर्म आपल्या पद्धतीने विश्वाचे कोडे सोडवायला लागले. 
      जे दिसते, भासते,जे विज्ञानाच्या निकषावर टिकते तेच सत्य असे विज्ञान म्हणते.
      तू विश्वास ठेव म्हणजे तुला सत्याचे ज्ञान होईल असे अध्यात्म म्हणते.
      आजूबाजूचे जग हे सत्य आहे असे विज्ञान म्हणते. तर जग ही माया आहे असे अध्यात्म म्हणते.
    वैज्ञानिक निकषावर अध्यात्म टिकत नाही.पण वैज्ञानिक निकष ही काला प्रमाणे बदलत जातात.त्यामुळे विज्ञान आज जे निष्कर्ष काढेल ते अजून काही वर्षानंतर चुकिचे तरी ठरतात किंवा त्यात बदल होतो.आणि विज्ञान ते नम्रपणे मान्य करते.
     एकूणच हे सगळं मान्य केलं तरी आऊट ऑफ बॉक्स विचार केला तर काही वेगळेच प्रश्न निर्माण होतात.
     आपण सगळे मानव आहोत. आपल्या विकसनशील मेंदूच्या आकलनां नुसार ,शारीरिक आणि मानसिक मर्यादा आणि बलस्थानानुसार  जगाकडे पाहत असतो. एका माणसाला जे दिसेल तेच शंभर माणसांना,तेच हजार माणसांना,तेच लाखो कोट्यावधी माणसांना दिसत म्हणून ते सत्य आहे असे म्हणतो. जर एका माणसाने आंब्याचे झाड पाहिले तर हजार, शंभर, लाखो माणसाना पण तेच आंब्याचे झाड दिसेल.कारण सगळ्यांकडे "माणसाचा" मेंदू आहे. म्हणून सर्व माणसांसाठी तेच सत्य आहे. पण समजा अगदी रात्रीचा मिट्ट काळोख आहे.डोळ्यात बोट घातले तरी दिसत नाही.त्यावेळी कुठल्याच माणसाला ते दिसणार नाही.कारण अंधारात पहायची मानवी मेंदूची क्षमताच नाही. पण वटवाघूळ किंवा मांजराला ते दिसूं शकते. कारण अंधारात पाहण्याची विशेष क्षमता त्यांच्याकडे असते
     जे दिसते ते सत्य आहे असे मेंदूचे आकलन सांगते.वास्तवात ते वेगळे असू शकते तसेच जे दिसत नाही ते मानवी मेंदूला आकलन झालेले नसते पण ते वास्तवात तिथे असण्याची शक्यता असू शकते.
     एकूणच मानवी बुद्धी जेवढ आकलन करेल तेव्हढंच सत्य असते असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा ते मानवी आकलनाच्या मर्यादेत राहून केलेले विधान असते.
     विश्वनिर्मितीच्या प्रक्रियेत माणूस निर्माण झाला आणि त्यानेच विश्वनिर्मितीची प्रक्रिया शोधून काढली किती विलक्षण आहे हे!

भाग-2

प्रशांत शेलटकर
8600583846
29/06/2021

No comments:

Post a Comment