Friday 5 February 2021

पेशकश...

शब्दांची पेशकश......

अर्धा भरलेला, अर्धा सांडलेला असा चहाचा कप कोणी तुमच्यासमोर आदळला तर कस वाटेल? आणि तेच कुणी एक सूंदर नक्षी असलेला चहाचा कप अत्यन्त अदबीने तुमच्या समोर ठेवला तर कसं वाटेल??
     कोणतीही , सेवा,गाणं कस सादर होतं त्यावर तुमचा आनंद ठरतो..गाण्याचंही तसंच आहे. बरेच जण गाणं नुसतं म्हणतात ..फार थोडे असे असतात की ते गाणं पेश करतात..ही पेशकश श्रोत्याला स्वर्गसुख नव्हे कर्णसुख देते....
     गाण्यातल्या शब्दांना न्याय देणं हे मोजक्या गायक-गायिकांना अजून पर्यंत जमलंय,त्यात आशाताईंचा नंबर खूप वरचा आहे..
     त्यानी मुंबईचा फोजदार चित्रपटातल ...का रे दुरावा ऐका...त्यात एक अंतरा आहे..
रात जागवावी असे आज वाटे
तृप्त झोप यावी पहाटे पहाटे
यात आशाताईंनी तृप्त हा शब्द असा काही पेश केलाय की ...खरोखरच सगळ्या तनामनात तृप्तता भरून रहाते...
त्यांचं दुसर् एक गाणं आहे,बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील... माझ्या मनी प्रियाची... त्यात एक अंतरा आहे,

नाथा तुझी करावी सेवा मौनभावे
हळुवार स्पर्श होता वेलीस फुल यावे...
आई होण्याचे स्वप्न खूप मार्मिक शब्दात मांडले आहे...यातील स्पर्श या शब्दाचा उच्चार आशाताईंनी असा केलाय ,...ती हळुवार स्पर्श अगदी जाणवतो आपल्याला...पुन्हा पुन्हा ऐकाव अस वाटत राहतं.. तुम्ही कधी हे गाणं ऐकल तर पुन्हा ऐका..
    मराठी नसूनही शब्दांना समर्थ न्याय देणारा अमराठी गायक  म्हणजे महेंद्र कपूर.त्यानी बहुतेक गाणी दादा कोंडके यांच्यासाठी गायली आहेत. दादांची गाणी म्हणजे अस्सल गावरान ठसका..पश्चिम महाराष्ट्रातील बोली भाषेत बहुतेक  शब्दांना "ह"  चा तडका असतो..उदाहरण म्हणजे गाव अस म्हणायचं असेल तर गाहाव अस बोललं जातं. त्यांच्या प्रत्येक गावरानगाण्यात हा ग्रामीण तडका पुरेपूर उतरलाय.. त्यांनी गायलेले एक गाणं म्हणजे 
सजणी ग भुललो मी काय जादू झाली ,...बघून तुला जीव माझा होई वर खाली यामध्ये शेवटचा अंतरा असा आहे की
येशील का घरी तू लक्ष्मीच्या चाली
असा आहे ..खरं तर ओळीत नायिकेला नायकाने  प्रपोज केलंय.. प्रपोज करतानाचा सगळा हळवेपणा महेंद्रजीनी गाण्यात पूर्णपणे उतरवला आहे.यातील लक्ष्मीच्या चाली हा उच्चार तर चाबूकच आहे. हेच गाणं मी अनेक गायकांच्या तोंडून ऐकल पण हा शब्द त्या नजाकतीने कोणीच म्हटलेला नाही..गाणं ऐकताना मी या शब्दाकडे नेहमीच किंचित थबकलो आहे...
    प्रत्येक शब्द किती महत्वाचा असतो ना..प्रल्हाद शिंदे यांनी गायलेले जगी जीवनाचे सार ...ऐका त्यातील शुद्ध होई अंतः करणं ऐका, त्यातील अंतः करणं हा शब्द ऐका. अनुराधा ताईनी हेच गाणं गायलं आहे.त्यातील तोच शब्द ऐका... प्रल्हाद शिंदे यांचा अंतःकरण हा शब्द जास्त अचूक वाटतो..
    खर तर शब्द म्हणजे केवळ अक्षरांचा अर्थपूर्ण क्रम नव्हे त्या अर्थपूर्ण क्रमालाही अर्थ असतो ,भावना असतात,त्या ओळखुन निगुतीने पेश करणे हे संगीतकार आणि गायकाचे कौशल्य असतं... बाबूजी अर्थात सुधीर फडके त्यातला बाप माणूस,पण त्याविषयी नंतर कधीतरी....

-प्रशांत शेलटकर
 8600583846

No comments:

Post a Comment