Saturday 21 November 2020

समांतर

समांतर

आपण दोघे...
रेल्वेचे दोन समांतर रूळ
समांतर असलो तरी
समान "अंतर" नसलेले
पण सम "अंतर "असलेले

तुझ्यापासून दूर नाही
पण तुझ्याजवळही नाही
तुझ्या माझ्या सांध्यांना
तसाही काही अर्थ नाही

नैतिकतेच्या मालगाडीचे
अवघड अखंड ओझे
जितके तुझ्यावर
तितकेच माझ्यावर...

जवळ आलो तरी अपघात
लांब गेलो तरी अपघात
आपण फक्त अंतर ठेवायचे
नियती नावाच्या अभियंत्याने
आखून दिलेल्या अचूक मापात

स्पर्श नसला तर काय झालं
सहअस्तित्व तर आहे ना...
प्रेम नावाची पटरी,
शेवटी बांधून ठेवतेच ना..
मग असूदे ना...
नियतीच्या मालगाडीचे 
अवघड ओझे...
मग असुदेत आपण समांतर
जायचं तर एकत्र आहेच ना
जायचं तर एकत्र आहेच ना

-प्रशांत शशिकांत शेलटकर
8600583846









No comments:

Post a Comment