Tuesday 3 March 2020

प्रस्थान

प्रस्थान..


शेर इथला संपला,
आता विझत विझत चाललो
दुःख बांधून कनवटीला
मी हसत हसत चाललो.....

जे आपले म्हणालो
ते बिलंदर निघाले,
अश्रू गहाण ठेवले त्यांनी
मज पुरते लुटून नेले
मीच माझ्या सुखाला
वेस दाखवून आलो..
दुःख बांधून कनवटीला
मी हसत हसत चाललो.....

जे जगलो कसेतरी
आयुष्य त्या म्हणावे लागले
ठिगळ लावलेल्या जिंदगीला
भरजरी म्हणावे लागले...
आवरून आयुष्याला
मी कधीच पांथस्थ झालो
दुःख बांधून कनवटीला
मी हसत हसत चाललो.....


जे लाभले क्षणभर,
त्यास प्रेम म्हणावे लागले
जे सोसले मणभर
त्यास प्राक्तन म्हणावे लागले
जे लाभले क्षणभर
त्यात धन्य धन्य झालो
दुःख बांधून कनवटीला
मी हसत हसत चाललो.....

आता न उरली आशा
कुणाच्या कौतुकाची
ना पर्वा  आता उरली
कुणा निंदकाची,
देणे सर्व आयुष्याचे 
मी फेडीत चाललो
दुःख बांधून कनवटीला
मी हसत हसत चाललो.....

शेर इथला संपला,
आता विझत विझत चाललो
दुःख बांधून कनवटीला
मी हसत हसत चाललो.....

-प्रशांत शेलटकर
 8600583846

No comments:

Post a Comment