पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी मी चिपळूण येथे नोकरी करत होतो.खरं म्हणजे माझी बदली तिथे झाली होती. आमचं हेड ऑफिस रत्नागिरीत. मी दर शनिवारी घरी रत्नागिरीस येत असे. पण त्या दिवशी आमच्या हेड ऑफिस मध्ये पैशाची निकड भासली म्हणून मी संध्याकाळी निघालो,
जून महिन्याचे दिवस...प्रचंड पाऊस पडत होता. घरी सांगावं की येतोय म्हणून तर ऑफीसचा फोन डेड झालेला..त्यावेळी मोबाईल नव्हते.
मी कॅश घेऊन तडक बसस्टँड वर आलो..तिथे समजलं रत्नागिरीला जाणारी बस तास भर उशिरा सुटणार..वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता..पाऊस मी म्हणत होता..सगळीकडे तुडुंब पाणी ...आभाळ फाटल्या सारखा पाऊस पडत होता.
तासभर गेला असाच वाट पाहण्यात..अखेर सहाची बस सुटली रात्री आठ वाजता, आणि त्या प्रचंड पावसामुळे रत्नागिरीस पोहोचायला 11 वाजले. मी स्टँडला उतरलो..पाऊस चालूच होता. माझ्या घरी जाणाऱ्या बसेस कधीच निघून गेल्या होत्या...सगळं स्टँड गूढ भूतबंगल्यासारखं वाटत होतं.मी तिथेच वाट पहात उभा राहिलो काही वाहन दिसत का ते पाहत.
इतक्यात एक रिक्षावाला समोर उभा राहिला.
"कुठे जाणार?..तो
" कोळंबे फाटा"..मी
'चला...तो म्हणाला
मी निघालो..इथून पुढे एक थरारक भयनाट्य घडणार होत..ज्याची मला अजिबात कल्पना नव्हती...
मी जेव्हा आमच्या बसस्टॉप जवळ उतरलो तेव्हा रात्रीचे साडे अकरा वाजले होते. पाऊस पडतच होता. स्टॉप जवळच एक जुनी धर्मशाळा आहे. मला पैसे भिजतील याची भीती वाटत होती. पाऊस कमी झाला की जाऊ असा विचार करून मी त्या धर्मशाळेचा आश्रय घेतला. जेमतेम दहा बाय दहाची दगडी जमीन असलेली ही खूप जुनी धर्मशाळा. मी तिथंच बसलो. बाजूला एक काळं कुत्रं पाय पोटाशी घेऊन झोपलेलं..धर्मशाळेच्या उतरत्या छपरावरून पावसाच्या पागोळ्या अखंड वहात होत्या... डोळ्यात बोट घातलं तरी समोरच दिसत नव्हतं..बेडक एका सुरात गात होती आणि धर्मशाळेच्या मागच्या बाजूला आमची कॉलनी काळोखाची चादर घेऊन गुडूप झोपलेली...
समोरच्या डांबरी सडके वरून पाण्याचा जणू ओढा वाहत होता. सगळी कडे पाण्याचेच आवाज येत होते. का कोण जाणे काहीतरी अघोर होणार याची मला जाणीव होत होती.
तेवढतात रत्नागिरी च्या दिशेकडून एक रिक्षा येऊन थांबली.आता एवढया रात्री कोण आलं म्हणून माझीही उत्सुकता चाळवली . त्या मिट्ट अंधारात मी अंदाज घेऊ लागलो.अचानक माझ्या बाजूला बसलेलं काळ कुत्रं बेसूर रडायला लागलं...नक्कीच काहितरी अशुभ घडणार. ...
- त्या रिक्षातून एक स्त्री उतरली.. रस्ता क्रॉस करून ती माझ्याच दिशेने येतेय...त्याच वेळी रस्त्याच्या दुसऱ्या टोकाकडून ट्रक येतोय...आणि हे काय? तिला समजत नाहीये का? मरेल ना ती! मी ओरडतोय ...हाका मारतोय ....कळत नाही का तिला? अरे तो ट्रक आला ना तिथे...तिला उडवलं त्याने...भर पावसात माझ्या अंगातून घामाच्या धारा वाहिल्या...मी धावतच रस्त्यावर गेलो ती बेशुद्ध पडली होती..निदान मला तस वाटलं..तीच डोकं फुटलं होत...रक्ताचे ओघोळ तिच्या चेहऱ्यावरन वाहत होते..मी तिला उठवून बसवावे म्हणून खाली वाकलो .तिच्या मानेखाली हात घातला...आणि एक अस्फुट किंचाळी माझ्या घशातून बाहेर पडली...तीच शरीर बर्फ़ासारखं थंड..नुकत्याच मरण पावलेल्या माणसाचं शरीर इतकं थंड? नेमकी कोण आहे ही स्त्री ...जिवंत की भूत?
अचानक तिने एक सुस्कारा दिला...
चला जिवंत तरी दिसते...मी ही सुस्कारा टाकला , तिला म्हटलं...
' बाई काळजी करू नका..मी आहे ना...
हो रे तुझीच वाट पहात होते....तिने माझ्याकडे रोखून पाहिलं ...तिची थंड नजर माझं काळीज चिरत गेली..
"चल माझ्या बरोबर मी तुला न्यायला आलेय....असं म्हणून तिने मला मिठी मारली...माझा श्वास कोंडत चाललाय.. डोळे बाहेर येतायत... एक उग्र दर्प माझ्या नाकात भरून राहिलाय..मघाचे सगळे पावसाचे ,बेडकांचे आवाज गायब होतायत फक्त एकच आवाज कानात भरून राहिलाय.."चल मी तुला न्यायला आलेय"
मी निपचित पडलोय...माझा देह थंड पडत चाललाय... बस्स आता शेवटचा श्वास....आणि अचानक हा आवाज कसला येतोय? छंन छंन...मी परत ऐकू लागलो... होय परत तोच आवाज छंन छंन आणि आता काठीचाही आवाज येतोय...
आणि अचानक तिची मगर मिठी सैल झाली एक गगनभेदी किंकाळी देऊन त्या बाईने बाजूच्या विहिरीत स्वतःला झोकून दिले... धाड दिशी आवाज झाला...रातकिड्यांची किरकिर क्षणभर थांबली...बेडकेही क्षणभर विसावली ...काहीतरी अमंगल काहीतरी अघोरी घडतंय याची जाणीव जीवांना असतेच...
अचानक माझ्या कपाळावर एक उबदार स्पर्श झाला....
माझ्या बाजूला एक धिप्पाड आकृती उभी होती..पांढरे शुभ्र धोतर..पांढराच सदरा.. डोईला शुभ्र फेटा..भरदार मिशा आणि हातात तीच घुंगर वाली काठी ..ती काठी रस्त्यावर दोनवेळा आपटून ती आकृती म्हणाली...
" उठ .." आवाजात जरब होती .
मी धडपडत उठलो. का कोण जाणे कुठून धीर आला होता.पण सगळी भीती नाहीशी झाली क्षणभर..
आता डोळ्यातील भीती गेली आणि त्याची जागा अश्रूंनी घेतली. हात जोडले म्हटलं " बाबा आभारी आहे"
" कुठे अवसेला फिरतोय रात्री अपरात्री..चल घरी चल ..सोडतो तुला..."
बापरे आज अमावस्या ..! परत भीतीची एक लहर सगळ्या शरीरात सळसळली...मी परत विहिरीकडे पाहिलं...
"पण बाबा तुम्ही कोण आणि तुम्ही काय करताय इथे आणि ती बाई कोण होती?" मी विचारलं.
ती व्यक्ती हसून म्हणाली ' तू घरी चल आधी आणि ते पुडक घे पैशाचं..
माझी मती बधिर झाली होती .मला काहीच कळेना काय होतंय. मी निमूटपणे माझी बॅग घेतली आणि बाबांसोबत चालू लागलो.
आता फक्त त्या घुंगुरवाल्या काठीचाच आवाज येत होता ,छंन छंन....
हा आवाज कुठेतरी ऐकलय! चालता चालता विचार करत होतो... अचानक लख्खकन वीज चमकावी तसं आठवलं..अशीच पावसाळी रात्र होती. लाईट गेलेले मी घरी झोपेची आराधना करण्याचा प्रयत्न करत होतो..साधारण रात्रीचे बारा वाजले असतील. बाहेरून छ्न छन असा आवाज येत होता. कदाचीत मला भास होत असावेत.मी परत पांघरूण ओढून झोपायचा प्रयत्न केला..पण तरी आवाज थांबेना..आता तो जवळ जवळ आल्यासारखा वाटत होता.
मला राहवलं नाही , मी खिडकी उघडली आणि आवाजाचा कानोसा घेतला..
खिडकीतून जे दिसलं ते अदभुत होतं.
एक व्यक्ती हातातली घुंगुरवाली काठी जमिनीवर टेकवत जात होती त्याचा आवाज येत होता. पांढरे धोतर ,पांढरा सदरा आणि पांढराच फेटा.. ती जशी आली तशी निघून गेली. तो काठीचा आवाजही दूर दूर गेला आणि बंद झाला. मी खिडकी लावली..घड्याळात पाहिलं बारा वाजून दोन मिनिटे आणि पंधरा सेकंद झाले होते. मला काही कळत नव्हतं . आपल्या पंचक्रोशीत एवढी उंच व्यक्ती मी पाहिलीच नव्हती..कोण असेल ती? आणि एवढया रात्री कुठे गेली? सकाळी विचारायचं अस ठरवून मी गुडूप झोपलो.
सकाळी चहा घेता घेता आईला विचारलं..तस आई जवळ आली म्हणाली "भाग्यवान आहेस तू..अरे तो महापुरुष सहसा कोणाला दिसत नाही काल अमावस्या ना! त्याचा फेरा असतो"
.....
....सार काही लख्ख आठवलं तो पर्यंत माझ्या घराचं गेट जवळ आलं होतं..म्हणजे मला ज्यांन ज्या हडळीच्या तडाख्यातुन वाचवलं तो महापुरुष होता?
अंगातून सर्रकन काटा उभा राहिला..बाजूला पाहिलं कुणीच नव्हतं..मी दारात सुरक्षित पोहोचलो..ज्याच्या पायावर डोकं ठेवावं तो अदृश्य झाला होता... मला आज महापुरुषान वाचवलं होतं...नकळत हात जोडले गेले..
मी दारावरची बेल वाजवली..बायकोने दार उघडलं..तिच्या चेहऱ्यावर असंख्य प्रश्न....
मी फक्त एवढंच म्हणालो,
"आपण उद्या सकाळी महापुरुषाला नारळ दयायला जायचय "
रात्री थकून अंथरुणाला अंग टेकले आणि तिथूनच पुन्हा एकदा हात जोडले आणि अश्रूंना मुक्त वाट करून दिली.....
-समाप्त
-वरील कथा काल्पनिक असून फक्त मनोरंजनाच्या हेतूने लिहिली आहे.
-प्रशांत शेलटकर
8600583846
No comments:
Post a Comment