Sunday 3 June 2018

शुक्रराणी

झगमगत्या नभसदनी तो चंद्र एकला होता
ओढूनीं मेघाची दुलई तो आत लपला होता

होत्या लक्ष तारका त्या विशाल तारांगणी
होती प्रत्येक तारका जरी सौन्दर्याची खनी
परी हरवला कुठे तरी तो निशाधिपती होता
ओढूनीं मेघाची दुलई तो आत लपला होता
झगमगत्या नभसदनी तो चंद्र एकला होता

लाजती सजती  नक्षत्रयुवती त्या नभांगणी
चंद्रास वरण्याची त्या किती स्वप्नेच पहाती
स्वप्नात परी शशीच्या तो एकच ध्यास होता
ओढूनीं मेघाची दुलई तो आत लपला होता
झगमगत्या नभसदनी तो चंद्र एकला होता

वाट पाहता पाहता तिची मग पहाट झाली
लेवून  शूभ्रचांदणे  चांदणी शुक्राची लाजली
प्रियतमेस पाहुनी मग तो चंद्र हसला होता
फेकून मेघांची दुलई मग तेजात नाहला होता
झगमगत्या नभसदनी तो चंद्र एकला होता

क्षणाची संगती लाभते ग शुक्रराणी जरी तुझी
तुझ्यावरच जडते ग हरघडी प्रीत माझी
मग मावळताना चंद्र तो उदास हसला होता
अश्रू दवाचा मग धरेवर ओघळला होता

-प्रशांत शेलटकर
  8600583846

No comments:

Post a Comment