Sunday 6 May 2018

नेहरू

आपल्याकडे कोणत्याहि विषयाचं सटीक विश्लेषण करण्याची पद्धत जवळजवळ नाहीच आहे...बऱ्याच जणांची विचार करण्याची पद्धत ब्लॅक अँड व्हाइट पद्धतीची असते. कोणत्याही राष्ट्रीय व्यक्तीमत्वाचा एकतर पराकोटीचा द्वेष करायचा अथवा त्याची पूजा बांधायची अस काहीस विचित्र चाललेलं असत. गांधी , सावरकर, आंबेडकर ,नेहरू ,बोस इत्यादी व्यक्तींच्या वाट्याला हेच आलं आहे.
      एखाद्या राष्ट्रीय व्यक्तिमत्वाचा अभ्यास करायचा असेल तर अनेक संदर्भ अभ्यासावे लागतात..टिपण काढावे लागते, उलट सुलट विचार करावा लागतो. एक प्रकारचा तटस्थपणा असावा लागतो..तेवढी तयारी माझी तरी नाही आणि सोशल मीडियावर आलेल्या पोस्ट म्हणजे ज्ञान या भ्रमात मी तरी नाही. परंतु माझ्या माहिती प्रमाणे मला नेहरूनविषयी काय वाटत ते मी सांगतो.
     स्वातंत्र्यांनंतर आपल्याकडे टाचणी पण आयात करावी लागत होती.अन्न धान्य आयात करावे लागत होते एकूणच नेहरूनसमोर फार मोठे आव्हान होते. ते त्यांनी यशस्वीपणे पेलले यात वाद नाही. औद्योगिक धोरण,पंचवार्षिक योजना,यामुळे मूलभूत विकासाचा पाया घातला गेला याबद्दल मला नेहरु नेहमीच आदरणीय वाटतात. देशाची विकासनीती  त्यानी तयार केली हे नक्कीच पण ...
   परराष्ट्र धोरण आणि सामाजिक धोरण यात ते कमी पडले.याबाबतीत नेहरूंनी पूर्वग्रह ठेऊन काम केलं अस मला वाटतं.
     काश्मीर व चीनयुद्ध त्यांचेच काळात उद्भवले तिथे नेहरू पूर्ण अयशस्वी झाले कारण त्यांना या समस्यांचे आकलनच झालं नाही कारण पूर्वग्रह.
     चीन आपला बंधू आहे तो कधीच आक्रमण करणार नाही हा पूर्वग्रह आणि काश्मीर प्रश्न युनो सोडवेल व आपली आंतरराष्ट्रीय प्रतिमा उजळून निघेल हा आणखी एक पूर्वग्रह..
दुसरं म्हणजे शिवाजी त्यांना लुटारू वाटतो..याच कारण नेहरू हे पुस्तकी पंडित होते.इंग्रजांनी आणि मुघलांनी लिहिलेल्या बखरींवरून त्यांनी आपले मत बनवले असण्याची शक्यता आहे. या ठिकाणी मी थोडं विषयांतर करतो.
    म. गांधी आणि स्वामी विवेकानंद याना त्यांच्या गुरूंनी अनुक्रमे गोपाळ कृष्ण गोखले व राम कृष्ण परमहंस यांनी दोघांनाही सार्वजनिक जीवनात प्रवेश करण्यापूर्वी भारतभ्रमण करण्याचा सल्ला दिला होता ,त्यामुळे दोघांनीही संपूर्ण भारत देश फिरून समजून घेतला त्यामुळे त्यांना या खंडप्राय देशाचे आकलन झाले.देशाची परंपरा, श्रद्धा, आणि जनमानसाचा पोत समजला. त्यामुळे देशाच्या समस्यांची अचूक जाण या दोन्हीही नेत्यांकडे होती..
     याउलट नेहरू हे रेडिमेड नेते होते .त्यांचे शिक्षण विदेशात झाल्याने ते देशाकडे पाहताना विदेशी दृष्टिकोनातून पहात. त्यामुळे नेहरूंनी देशात आधुनिकतेचा पाया घातला तरी सामाजिक प्रश्नाचे त्यांचे आकलन कमी पडले..
      मी नेहरूंकडे पहाताना याच प्लस / मायनस दृष्टीने पाहतो...
       धन्यवाद
-प्रशांत शेलटकर

No comments:

Post a Comment