Wednesday 11 April 2018

शून्य..

बरे झाले मी शून्य झालो....
कधी न इतका मी धन्य झालो

नकाराची न खंत आता
होकाराचा न आनंद आता...
चांदणे उन्हाचे  झेलीत चाललो
बरे झाले मी शून्य झालो....
कधी न इतका मी धन्य झालो

आलो कुठून हे ठाऊक नाही
जावे कुठे ते ठरवलेच नाही
उरी माझेच गाणे गात चाललो
बरे झाले मी शून्य झालो....
कधी न इतका मी धन्य झालो

देव शोधता शोधता देव झालो
देणे स्वतःचे स्वतःलाच देत गेलो
अन देता देता मी पूर्ण होत गेलो
बरे झाले मी शून्य झालो....
कधी न इतका मी धन्य झालो

ही शून्यावस्था की म्हणू समाधी
नको रे मनाला कसली उपाधी
जडातून असा मी चैतन्य झालो
बरे झाले मी शून्य झालो
कधी न इतका मी धन्य झालो

-प्रशांत शेलटकर
रत्नागिरी

No comments:

Post a Comment