Thursday 22 September 2022

ऐसी अक्षरे कुंथविन

...

कुंथविन? की मेळविन?
माझ्या बाबतीत तरी कुंथविनच...कारण माझे हस्ताक्षर..माझं अक्षर सुंदर सोडा तर साधं सुबक पण नाही..याची खंत आयुष्यभर आहे..अक्षराच्या बाबतीत मी महात्मा गांधींच्या पंथातला आहे. त्यांचं अक्षर पण वाईट होत..त्याची म्हणे त्याना आयुष्यभर खंत होती.
    पाटीभर पसरलेला अ नंतर लहान होत दोन ओळीत नंतर एका ओळीत विसावला तरी तो सुबक कधीच नव्हता..त्याच्या वळणात कधीच नाजूकता नव्हती..तो कायम ओम पुरीच्या गाला सारखा खडबडीत राहिला..
     अ पासून सुरू झालेली अक्षरगाथा ज्ञ पर्यंत तशीच राहिली..अक्षर कायम ओळीच्या ट्रॅक वरून कधी घसरली कधी सावरली..नीलिमा नावाची मैत्रीण होती पहिलीत असताना ..माझा इ बघून ती  इ sss अस मोठ्याने किंचाळली . पण तिनेच मला इ काढायला शिकवला..क्ष म्हणजे आधी १ काढायचा त्याच्या खाली ५ काढायचा ..ज्ञ म्हणजे २ च्या डोक्यावर आडवी काठी...अस काहीबाही सांगायची ..पण माझं हस्ताक्षर यथातथाच राहील...काही अक्षर अक्षरशः भामटी असतात..भ आणि म ,ध आणि घ .. पटकन समजायचंच नाही.. र पुढे चालला होता आणि व मागून ...मध्येच व ला लहर येते आणि तो र ची तंगडी धरून मागे खेचतो मग त्याचा ख होतो...पोटफोडया ष हे खुनी उत्पत्ती असलेले आणखी एक अक्षर..ह ळ क्ष ज्ञ हे बिचारे बॅक बेंचर्स...मागे मागे राहणारे...माझ्या सारखे..
     शाळेत असताना एकदाच निबंध स्पर्धेत भाग घेतला , टिळक या विषयावर निबंध लिहिला होता... त्यात मला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले..ते माझे एकमेव बक्षीस...मला खात्री आहे.. माझ्या अगम्य अक्षरामुळे माझा नंबर गेला असावा...
     ज्यांची अक्षरे सुंदर त्यानी शिव्या जरी लिहिल्या तरी त्या ओव्या भासतात आणि ज्याचे अक्षर वाईट्ट त्यानी ओव्या जरी लिहिल्या तरी त्या शिव्या वाटतात.
     ज्याचे अक्षर सुंदर त्याचे जीवन सुंदर अशी भपंक अंधश्रद्धा आमच्या बालमनावर कोणीतरी ठसवली होती..पुढे छत्र्यांवर सुंदर रेखीव नाव घालणारे कलाकार पाहिले आणि गचाळ प्रिस्क्रिबशन लिहिणारे डॉक्टर पाहिले आणि ते भ्रम दूर झाले...यशस्वी होण्याचा आणि अक्षराचा तसा काही संबंध नसतो हे राष्ट्रपित्याच्या उदाहरणावरून लक्षात येते...
     सुंदर अक्षर असणाऱ्यांचा हेवा वाटतो कधी कधी...अगदी छापल्यासारखी घोटीव अक्षरे पेनातून  कागदावर झरझर उतरताना पहिली की माझ्याच वहीत कावळे चिमण्यांचे बेफाम समूह नृत्य का होते ते कळत नाही..
     शेवटी मनाची समजूत घातलीय..असू दे अक्षर वाईट... भावना तर चांगली आहे ना...
    "तळपट होऊ दे मेल्याचा .." अस कितीही सुरेख अक्षरात लिहिलं तरी या वाक्याचा आत्मा च हिडीस आहे..सनी लियॉन नथ घालून नऊवारी नेसली तरी सुलोचना बाईंची सात्विकता तिच्यात कुठे येणार...नाही का??

म्हणून...

कुंथवीन तर कुंथविन पण लिहीन..

- प्रशांत शेलटकर
   8600583846

No comments:

Post a Comment