Ad

Wednesday 26 January 2022

लेख- प्रजासत्ताक

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने....

सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ...💐

विश्ववंदनीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमातून संविधान निर्माण झाले आणि आजच्या दिवशी आपण प्रजासत्ताक झालो...
    विविध धर्म,परंपरा,परस्परविरोधी विचार धारा प्रजासत्ताकच्या एका धाग्याने बांधल्या गेल्या. तसे पाहिले तर या देशात परस्परविरोधी विचारांचा आदर आणि सन्मान करायची परंपरा नक्कीच आहे. काही वेळा टोकाची कटुता निर्माण होते हे सत्य असले तरी जगा आणि जगू द्या या तत्वाचा जीन्स आपणा भारतीयांमध्ये आहे हे नाकारून चालणार नाही.
      परंतु सद्यस्थितीत हे कुठेतरी कमजोर होत जातंय अस वाटतं. सगळी माणस समान आहेत यापेक्षा  परस्परातील असमानता समान आहे  हे जास्त करेक्ट विधान आहे. शारीरिक,बौद्धिक असमानता असूनही आपण माणूस आहोत हे आपल्यातला समान धागा आहे. डावे-उजवे,प्रतिगामी-पुरोगामी, अभिजन -बहुजन ही वर्गवारी जगभरात सगळीकडे असली तरी  असे काटेकोर वर्ग कधीच नसतात. मेंदूत खिळ्यासारखे ठोकून घट्ट बसवलेले विचार बाजूला केले तर , डाव्यांमध्ये उजव्यांचा अंश,उजव्यांमध्ये डाव्यांचा अंश, प्रतिगामी बहुजन आणि पुरोगामी अभिजन अशी सरमिसळ असतेच. 
      गणिताचे लॉजिक समाजशास्त्राला लागत नाही.म्हणून माणसांचे विभाजन काटेकोर करता येत नाही.ते जात,धर्म आणि पंथाच्या सहाय्याने नक्कीच करता येते. त्यात सोशल आणि प्रिंट मीडिया मुळे आणखी एक वर्ग निर्माण झालाय. तो म्हणजे फॉलोअर्स. भूतकाळातल्या आणि वर्तमान काळातल्या नेत्यांचे फॉलोअर्स 
त्यात गांधीवादी,आंबेडकर वादी, सावरकर वादी,  वर्तमानात मोदी,राहुलगांधी,शरद पवार, ममता बॅनर्जी , दक्षिणेत अभिनेत्यांचे फॉलोअर्स, आंदोलन  जीवी नेत्यांचे फॉलोअर्स  अगदी लेखकांचे पण फॉलोअर्स..
      कोणाच्या विचारांचे अनुयायी असणे वाईट मुळीच नाही. अनुयायांच्या सामूहिक शक्तींनी कित्येक विधायक आणि विघातक दोन्ही प्रकारची  कामे केलेली आहेत. समाज घडवलेला आणि बिघडवलेला पण आहे.
    परस्परविरोधी विचारसरणीचे अनुयायी असणे ,त्यांच्यात वैचारिक संघर्ष असणे ही आपली हजारो वर्षांची परंपरा आहे, अशा परस्परविरोधी विचारामुळेच आपला सामाजिक समतोल टिकून आहे.विधायक टिकेने समाजातल्या विघातक गोष्टी कमी होतात पण सध्या कुठल्यातरी एका समाजालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते हे निखालस चूक आहे. केवळ समाजच नव्हे तर काही वेळा लिंगभेदही असतो. अर्थात लिंगभेद म्हटलं की फक्त स्त्रीवरचा अन्याय डोळ्यासमोर येतो अर्थात ते प्रमाण जास्त असल्याने ते साहजिक आहे परंतु   पुरुष म्हणून होणारे अन्याय हे नगण्य आहेत असे म्हणता येत नाहीत.
      असो , विषय असा आहे की एकाच वेळी मी गांधीवादी,आंबेडकर वादी,सावरकर वादी असू शकत नाही का? माझ्या सद्सद्विवेक बुद्धीला पटलेले गांधी, सावरकर,टिळक आंबेडकर, शाहू महाराज स्वीकारण्याचे स्वातंत्र्य मला असावे की नसावे.? की कोणाचा तरी एक शिक्का मारून घेऊन मी कोणाच्या तरी कळपात शिरावे.? मी अभिजन नसलो तर मी बहुजन असावेच का?आणि मी बहुजन नसलो तरी स्वतःला अभिजन म्हणवून घेण्यात धन्यता का मानावी? देशात नवीन जातीव्यवस्था तर निर्माण होत नाहीयेना? पुरोगामी लेखनाच्या नावाने कोणी नवीन मनुस्मृती तर लिहीत नाही ना?
       प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मला हे प्रश्न पडले आहेत. कदाचित त्याची उत्तरे आंबेडकर, सावरकर,शाहू, महात्मा गांधी,पेरियार, बुद्ध,कृष्ण विवेकानंद ,चार्वाक, कणाद देतीलच कारण परस्परविरोधी विरोधी असले तरी त्यांचा ल.सा.वि. एकच आहे तो म्हणजे भारतीयत्व....

पुन्हा एकदा सर्वाना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
💐💐💐💐💐💐

-प्रशांत शशिकांत शेलटकर
 8600583846
 रत्नागिरी...

No comments:

Post a Comment

नियती..

आपली स्वप्ने नियती कडून सेन्सॉर व्हावी लागतात..तरच ती  प्रत्यक्षात येतात.. नियती दुःख देते कारण माणूस फक्त सुखाची मांडणी करत बसतो..कुठल्या त...